Accredited by NAAC
Natwarlal Maniklal Dalal College

News

एन.एम.डी. महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा; प्रश्नमंजुषा स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

Friday, 16 October 2026

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या विचारांचा आदर्श घेऊन विद्यार्थ्यांनी ज्ञानसंपन्न व्हावे – प्राचार्य डॉ. रविंद्र मोहतुरे

Gallery

Tap the main image or a thumbnail to open the lightbox.

गोंदिया शिक्षण संस्था संचालित नटवरलाल माणिकलाल दलाल कला व वाणिज्य महाविद्यालय, गोंदिया येथील ग्रंथालय विभागाच्या वतीने भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती व वाचन प्रेरणा दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रविंद्र मोहतुरे होते. मंचावर वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. सरिता उदापूरकर, कला विभागाचे In- Charge डॉ. एच.पी. पारधी, विधी विभाग प्रमुख डॉ. सुयोग इंगळे, डॉ. बबन मेश्राम, डॉ. शशिकांत कडू हे होते. विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजविणे, ज्ञानार्जनाची आवड निर्माण करणे, वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे तसेच स्पर्धात्मक युगातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम बनविणे, या उद्देशाने ग्रंथालय विभागाच्या वतीने सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत कु. स्नेहल रहांगडाले (बी. ए. भाग-३, मराठी) हिने प्रथम क्रमांक पटकावला. कु. शितल ठवरे (एल.एल.बी. भाग-१) हिने द्वितीय क्रमांक, तर श्री. निखिल देशमुख (इयत्ता ११ वी, वाणिज्य) याने तृतीय क्रमांक प्राप्त केला. तसेच श्री. अर्पित अग्रवाल (बी. ए. भाग-३, राज्यशास्त्र) याने चौथा क्रमांक मिळवून उत्तेजनार्थ पारितोषिकाचा मान मिळविला. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभात विशेष गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य डॉ. रविंद्र मोहतुरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे जीवनकार्य, त्यांची वैज्ञानिक दृष्टी, शिक्षणाविषयीची तळमळ आणि राष्ट्रनिर्मितीतील योगदान यांचे महत्त्व त्यांनी विशद केले. विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासक्रमापुरते मर्यादित न राहता विविध विषयांतील पुस्तकांचे नियमित वाचन करावे, सामान्य ज्ञान वृद्धिंगत करावे आणि सातत्यपूर्ण परिश्रमांच्या बळावर आपले ध्येय साध्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. वाचनामुळे व्यक्तीची विचारशक्ती, कल्पनाशक्ती, निर्णयक्षमता आणि व्यक्तिमत्त्व विकसित होते. आजच्या माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात ज्ञान हीच खरी शक्ती असून विद्यार्थ्यांनी वाचन, चिंतन आणि संशोधनाची सवय जोपासणे आवश्यक आहे. डॉ. कलाम यांच्यासारखी मोठी स्वप्ने पाहून ती प्रत्यक्षात आणण्यासाठी जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रम यांची जोड द्यावी, असा प्रेरणादायी संदेशही त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून दिला. या उपक्रमामागील भूमिका स्पष्ट करताना ग्रंथपाल व ग्रंथालय विभागप्रमुख डॉ. सुनिल कुंडलिक जाधव यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात ग्रंथालयाचे महत्त्व अधोरेखित केले. ग्रंथालय हे केवळ पुस्तकांचे संग्रहालय नसून ज्ञाननिर्मिती, बौद्धिक विकास, संशोधनवृत्ती आणि व्यक्तिमत्त्व घडविणारे प्रेरणाकेंद्र आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करून त्यांना स्पर्धात्मक परीक्षांसाठी प्रोत्साहित करणे, सामान्य ज्ञानाची व्याप्ती वाढविणे आणि डॉ. कलाम यांच्या प्रेरणादायी विचारांचा प्रसार करणे हा या स्पर्धेचा प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे आभार डॉ. उमेश विद्यापुरे यांनी मानले. वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने आयोजित अशा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक स्पर्धात्मक वातावरण निर्माण होते. त्याचबरोबर आत्मविश्वास, जिज्ञासा, चिकित्सक विचार आणि ज्ञानसाधनेची प्रेरणा मिळते. त्यामुळे महाविद्यालयीन जीवनात शैक्षणिक उपक्रमांसोबतच बौद्धिक स्पर्धांचे आयोजन महत्त्वपूर्ण ठरते. कार्यक्रमात यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. या उपक्रमामुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना वाचन, ज्ञानार्जन आणि स्पर्धात्मक परीक्षांच्या तयारीसाठी नवी प्रेरणा मिळाली. या कार्यक्रमाचे आयोजन व समन्वयन ग्रंथालय विभागप्रमुख डॉ. सुनिल कुंडलिक जाधव यांनी केले डॉ. किशोर वासनिक, डॉ. तारेंद्र पटले, डॉ. भावेश जसानी, डॉ. घनश्याम गेडेकर, प्रा. प्रणय वासनिक,डॉ. प्रिया नंदेश्वर डॉ. अलका पाटील, श्री मनोज पटले, सतीश कटरे, श्री आशिष रंगारी श्री राजेश गुरव, श्री मुन्ना राणा हे उपस्थित होते. महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या विचारांचा वारसा जपत विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती आणि ज्ञानसाधनेची प्रेरणा निर्माण करणारा हा उपक्रम महाविद्यालयाच्या शैक्षणिक वाटचालीतील महत्त्वपूर्ण ठरला. प्राचार्य न.मा.द. महाविद्यालय, गोंदिया

← All news & events

Admissions & enquiries

We’re here to help you take the next step.